मुंबई - गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीच्या न्यायलयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम आणखी वाढणार की त्यांना जामीन मिळणार यावर आज मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्जावर ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार ( Hearing on MP Sanjay Raut bail or jail today in Mumbai Sessions Court ) आहे. त्यामुळे संजय राऊतांची यावर्षीची दिवाळी जेलमध्येच होणार की जेल बाहेर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील सुनावणी -संजय राऊत यांच्या जामीन ( sanjay raut bail in patrachal case ) अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे. यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या वतीने जामीन अर्जावर करण्यात आलेल्या युक्तीवादा दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकड कुठलेही पुरावे नाही तसेच प्रवीण राऊत त्यांच्यासोबत झालेला आर्थिक व्यवहार हा ब्लॅक मनी मधून झाला आहे असे कुठलेही पुरावे ईडीकडे नसल्याचे देखील संजय राऊत यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. यावर आज मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने युक्तीवाद करण्यात येणार आहे.
पत्राचाळ प्रकरण नेमकं काय ? - पत्राचाळ किंवा सिद्धार्थनगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्राचाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला होता. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.पत्राचाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल, तसंच म्हाडासाठी घरं बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारलं नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.
पत्राचाळ प्रकल्प ठप्प -जीएपीसीएलकडून भाडं भरलं जात नसल्याची तसंच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं भाडं भरेल, असं करारात नमूद करण्यात आलं होतं, पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडं भरलं. याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडे न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचं कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली, पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, यामुळे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ठप्प झाला होता.
पत्राचाळ पुनर्विकासाला 2021 मध्ये मान्यता - महाराष्ट्र सरकारने 2020 साली निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी स्थापन केली. ही कमिटी पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं पुनर्वसन कसं करायचं आणि घराची भाडी कशी द्यायची, याबाबत सल्ला देणार होती. जून 2021 साली राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आणि जुलै 2021 साली सरकारने याबाबतचा ठराव मांडला. फेब्रुवारी 2022 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पत्राचाळीचं ठप्प पडलेलं बांधकाम पुन्हा एकदा सुरू झाले.
ईडीचे आरोप - ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले, हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत, ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केल्याचे, ईडीने सांगितले आहे. वर्षा राऊत यांनी ही रक्कम दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला, असा दावा इडीने केला आहे. इडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले. 'याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले. यातल्या स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.
संजय राऊतांना अटक - सुजित पाटकर हे संजय राऊतांच्या जवळचे आहेत. जमिनीच्या या व्यवहारामध्ये नोंदणीकृत किंमतीशिवाय जमिन विकणाऱ्याला रोख रक्कमही देण्यात आली. ही संपत्ती आणि प्रविण राऊत यांच्या इतर संपत्तीची माहिती घेतल्यानंतर प्रविण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची संपत्ती जप्त करण्यात आली,' अशी माहिती इडीने दिली. दोन समन्सनंतर संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, त्यानंतर इडीने रविवारी सकाळीच संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. दिवसभर चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. इडीने याआधी राऊतांची दादर आणि अलिबागमधली संपत्ती जप्त केली आणि राऊत यांना अटक करण्यात आली होती.