मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिच्याकडून मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात दाखल केलेल्या 2 कोटींच्या नुकसान भरपाईच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रणौत हिला दिली. यानंतर यासंदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान प्रतिवादी करण्यात आलेले संजय राऊत यांच्याकडून यासंदर्भात स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याचे सांगण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने यावरची सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे.
हेही वाचा -कोरोनाचं महासंकट अन् राज्यातल्या रुग्णालयातील बेड्सची परिस्थिती
दरम्यान, या अगोदरच्या झालेल्या सुनावणीदरम्यान कंगना रणौत हिच्या वकिलांकडून न्यायालयात एक डीव्हीडी सादर करण्यात आली होती. या डीव्हीडीत संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये 'उखाड देंगे, उखाड दिया' अशा भाषेचा वापर करून कंगना रणौत हिला धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते. या प्रकरणांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एच वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्याला व शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या दोघांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. कंगना रणौतने तिला आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा या दोघांना त्यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या बांधकामाबद्दल महापालिकेने नोटीस बजावली होती, असे 8 सप्टेंबरला न्यायालयात सांगितले होते.