मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेले व्यवसायिक राज कुंद्रा यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीनावरील सुनावणी सत्र न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. राज कुंद्रा आणि रायन थोरपे या दोघांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
सत्र न्यायालयाने दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली
सत्र न्यायालयात मंगळवारी राज कुंद्रा यांच्या जामीनावर सुनावणी होणार होती. ही सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज कुंद्रा यांचे सहकारी रायन थोरपे यांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी मॅजिस्ट्रेट कोर्टाने राज कुंद्रा यांच्या जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर त्यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, सत्र न्यायालयात आतापर्यंत दोन वेळा राज कुंद्रा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळली
दरम्यान, यापूर्वी 7 ऑगस्ट रोजीही मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राची मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आणि अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थोरपेचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. यावेळी राज कुंद्राच्या सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील आदेशही संबंधित न्यायाधीशांच्या अनुपलब्धतेमुळे तेव्हा देण्यात आले नव्हते.
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.