महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bully Bai App Case : बुलीबाई ॲप प्रकरणातील आरोपी श्‍वेता सिंहच्या जामीन अर्जावर ५ फेब्रुवारीला सुनावणी - बुलीबाई ॲप

बुलीबाई ॲप प्रकरणातील आरोपी श्वेता सिंह हिच्या जामीन अर्जावर ५ फेब्रुवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणातील पहिला आरोपी विशाल झाच्या जामीन अर्जावर ५ फेब्रुवारी रोजी निकाल दिला जाणार आहे. मुस्लिम महिलांविषयी बदनामीकारक मजकूर असलेल्या बुलीबाई अॅप प्रकरणी या दोघांना मुंबईच्या सायबरल सेलने देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे.

BullyBai app case
बुलीबाई ॲप प्रकरण

By

Published : Feb 3, 2022, 8:24 AM IST

Updated : Feb 3, 2022, 8:31 AM IST

मुंबई- बुलीबाई ॲप ( Bully Bai App Case )प्रकरणात अटकेत असलेली आरोपी श्वेता सिंहच्या जामीन अर्जावर ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) सायबर सेलने आरोपी श्‍वेता सिंगला अटक ( Mumbai Cyber Cell ) केली होती. तिने वांद्रे कोर्टात जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपी श्‍वेताच्या जामीन अर्जावर २ फेब्रुवारीला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या अर्जावरील पुढील सुनावणी आता ५ फेब्रुवारीला होणार आहे. सत्र न्यायालयाने मुंबई सायबर सेलला ५ फेब्रुवारी पूर्वी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

बुलीबाई ॲप प्रकरणात श्‍वेता सिंह हिला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. या प्रकरणातील पहिला आरोपी विशाल झा याला बंगळुरु येथून अटक केल्यानंतर विशाल झाच्या माध्यमातून श्‍वेता सिंहला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी ७ जानेवारी रोजी श्‍वेता सिंहला मुंबईत आणल्यानंतर तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर श्‍वेता सिंह हिने मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला. या प्रकरणातील पहिला आरोपी विशाल झा याने देखील सत्र न्यायालयामध्ये जामीना करता अर्ज दाखल केला आहे. त्याच्या अर्जावर सत्र न्यायालय ५ फेब्रुवारी रोजी निकाल देणार आहे.

काय आहे बुलीबाई ॲप

बुलीबाई एक असं मोबाईल अॅप्लिकेशन आहे जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणाचा विविध स्तरांतून निषेध आणि संतपा व्यक्त झाला होता. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, माहिती आणि तंत्रज्ञानच्या (आयटी) कलम 67 च्या कलमांखाली गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

मायक्रॉसॉफ्ट आणि सॉफ्टवेअर शेअरिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या गिटहबवर बुलीबाई अ‍ॅप अपलोड करण्यात आले आहेत. अ‍ॅपचा उद्देश मुस्लिम महिलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचा आहे. अ‍ॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणी विशाल झाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. विशालने जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश एस. जे. घरत यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

विशाल अभियांत्रिकीचा विद्यार्थी

या प्रकरणातील विशाल झा हा मुख्य आरोपी नसून इतर राज्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींशी त्याचा काहीही संबंध नाही. विशालचा लॅपटॉप, फोन आणि सिम कार्ड पोलिसांनी जमा करून घेतले असून तो तपासत पूर्ण सहकार्य करत आहे. तसेच तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवत असल्याचा दावा त्याचे वकील शिवम देशमुख यांच्याकडून करण्यात आला. तर विशालची ६ ट्विटर, ६ इंस्टाग्राम, 1 यूट्यूब आणि 6 जी-मेल खाती आहेत. तसेच गिटहब प्लॅटफॉर्मवरील त्याच्या खात्याबाबत त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून बाजू मांडताना सांगण्यात आले. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून तो ५ फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे.

Last Updated : Feb 3, 2022, 8:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details