मुंबई- राज्यात आता लॉकडाऊन नाही तर अनलॉकचीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. कोरोना नियंत्रणाच्या कामांमध्ये राज्याने घेतलेला पुढाकार नंतरच्या काळात इतर राज्यांनी स्वीकारला आहे. तसेच राज्याचे कोरोनावरील नियंत्रण हे इतरांच्या दृष्टीने आदर्श ठरले आहे. याबरोबरच कोरोना नियंत्रणात पारदर्शकता ठेवल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांमधील बेडचे अधिग्रहण केले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले. सध्या राज्यात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून, ही बाब समाधानाची आहे. तसेच राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या, असेही राजेश टोपे म्हणाले.