मुंबई -मुंबईत वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत 118 लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण एकूण 15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लास देण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा नसल्याने आज 26 लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीचा तुटवडा असल्याने सांगली, सातारा आणि पुणे येथील लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. त्यानंतर येत्या दोन दिवसात मुंबईमधील लसीकरण ठप्प होणार आहे.
26 लसीकरण केंद्र बंद
मुंबईत एकूण 118 ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या 33, राज्य आणि केंद्र सरकारच्या 14 तसेच खासगी रुग्णालयात 71 केंद्रांवर लसीकरण केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सुरू असलेल्या खासगी रुग्णालयातील 71 केंद्रांपैकी 26 केंद्र बंद करण्यात आली आहेत. आज सायंकाळी आणखी 26 केंद्र बंद होतील. तर उर्वरित उद्यापासून बंद होतील. लसीचा साठा कमी असल्याने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महापालिकेची काही केंद्र उद्यापासून तर काही परवापासून बंद केली जाणार आहेत. कोवॅक्सीनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा 15 एप्रिलला मिळणार असल्याने तोपर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.
15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लस
मुंबईत एकूण 15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 14 लाख 30 हजार 394 लाभार्थ्यांना कोव्हीशील्ड तर 93 हजार 424 लाभार्थ्यांना कोवॅक्सीन लसीचा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 2 लाख 55 हजार 351 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 70 हजार 443 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 34 हजार 434 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 3 लाख 63 हजार 590 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.