मुंबई - कोरोना चाचण्यांची सुविधा पुरवण्यात महाराष्ट्र अव्वल असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्याकरता येऊ शकतात, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५९११ जणांचे नमूने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार असल्याची माहिती, त्यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची सुविधा वाढवण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याची दखल घेऊन केंद्राने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे.
सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्यांची दररोज २३०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. आता यासोबत आणखी तीन शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले. सांगितले.
राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २८०० चाचण्या होऊ शकतात. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या दीड लाख एन-९५ मास्क उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई कीट्स तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजूनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.