महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप

आरोग्य विभागातील भरती परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे रद्द केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. त्यानंतर विरोधकांनी यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले असून आरोग्यमंत्र्यांपासून सचिवापर्यंत सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यातच आज ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आरोग्य सेवा भरतीत लाखोंची बोली लावणारी आरोग्य भरतीसंदर्भतील मध्यस्थ आणि दलाल यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे.

prakash shendage
prakash shendage

By

Published : Sep 27, 2021, 3:05 PM IST

Updated : Sep 27, 2021, 3:19 PM IST

मुंबई - राज्याच्या आरोग्य सेवा भरतीत दलाल आणि एजेंट्सचा सुळसुळाट सुरू आहे. परीक्षाविना भरती करण्याचा घाट त्यांच्याकडून घातला जात असून यासाठी पंधरा लाखापर्यंत बोली लावण्यात आल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. या प्रकरणाची संभाषण क्लिप त्यांनी व्हायरल केली असून त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केली. तसेच राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारकडून संबंधितांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे
आरोग्य सेवा भरतीत महाघोटाळा -
राज्यातील आरोग्य विभागाच्या गट 'क' व 'ड' पदासाठीच्या परीक्षा शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आल्या. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा रद्द केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. विरोधकांनी यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या प्रकरणात महाघोटाळा झाल्याचा आरोप करत, न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीसह आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची थर्ड पार्टीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. शासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. हे प्रकरण ताजे असतानाच, आज ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आरोग्य सेवा भरतीत लाखोंची बोली लावणारी आरोग्य भरतीसंदर्भतील मध्यस्थ आणि दलाल यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लीपमुळे राज्य सरकारने खरंच आरोग्य सेवा भरती रद्द केली की दलालांना रान मोकळे करुन दिले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.


हे ही वाचा -...तर भाजपचे अंगवस्त्र म्हणूनच राहावे लागेल, शिवसेनेचा असदुद्दीन ओवेसींवर निशाणा

झारीतील शुक्राचार्य कोण ?

आरोग्य सेवा भरती प्रकरण धक्कादायक आहे. फार मोठा भ्रष्टाचार यात झाल्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अमरावती जिल्ह्याचा उल्लेख आहे. मात्र याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. क्लिपमध्ये न्यासा कंपनीचा उल्लेख आहे. न्यासा कंपनीचा मालक 84 दिवस तुरुंगात राहून आलेला आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, काय चाललंय नेमकं? या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली. तसेच समाजातील सर्व घटकांची मुले या परीक्षेची तयारी करत होते. या प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण हे समोर आले पाहिजे, असेही शेंडगे म्हणाले.

हे ही वाचा -किसान मोर्चाचा राज्य सरकारला धसका, मुख्यमंत्र्यांनी बोलावली नुकसान भरपाईसाठी बैठक



काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये -

भरतीसाठी एजंटमार्फत पंधरा लाख मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लास डी साठी सहा, क्लास बी साठी 13 लाख मागितल्यात येत असल्याचे ऑडिओ क्लिपमधून समजते. तसेच काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी केली जात आहे. काम होण्यापूर्वी 50 टक्के आणि 50 टक्के नंतर देण्याचा आग्रह केला जातो आहे. तर कामापूर्वी 50 टक्के जास्त असून थोडे पैसे कमी करण्याची विनंती दलालाकडून केल्याचे ऐकायला मिळते.

Last Updated : Sep 27, 2021, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details