मुंबई - मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाकडून (Mumbai BEST) परिवहन सेवा पुरवली जाते. परिवहन सेवा पुरवण्यासाठी चालक आणि वाहकांची नियुक्ती केली आहे. हे चालक वाहक बेस्टची सेवा केल्यावर त्यांच्या वयाची ४० वर्षे झाल्यावर आरोग्य तपासणी (Best Staff Health Checkup) केली जाते. या तपासणीत ज्या वाहक चालकांना कोणत्याही प्रकारचे आजार असल्याचे समोर आल्याने ते काम करण्यास सक्षम नसल्याचे समोर आल्यास त्यांना हलके काम दिले जाते, असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आला आहे. तर बेस्ट अशा कामगारांना कामावरून काढते असा, आरोप बेस्ट उपक्रमावर करण्यात आला आहे.
४० वय झालेल्या कर्मचाऱ्यांची होते तपासणी -मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमात सुमारे ४० हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी १० हजार चालक आणि १० हजार वाहक आहेत. या चालक वाहकांना दिवसभर बसमधून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम करावे लागते. बस चालवणे आणि प्रवाशांना गर्दीमध्ये तिकीट देणे, पास तपासणे आदी अवजड कामे करावी लागतात. बेस्टमध्ये काम करणारे चालक वाहक हे मुंबईबाहेरून कामावर येतात. त्यामुळे कामावर येण्यासाठी प्रवास नंतर काम आणि पुन्हा घरी जाण्याचा प्रवास यात कर्मचारी प्रचंड थकून जातात. त्यांना लवकर आजार पकडतात. यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ४० वय पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्य तपासणी दरम्यान डोळे, हृदयविकार आदी सर्व प्रकारची तपासणी केली जाते. ज्या कर्मचाऱ्यांना आजार असल्याचे समोर येते आणि जे कर्मचारी अवजड काम करू शकत नाहीत त्यांना हलकी कामे दिली जातात, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल व जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली.