मुंबई -अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी 2012 ते 2013 मध्ये पुण्यामध्ये आयोजित मानाचा मुजरा (Manacha Mujara expenses fraud) या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक बोगस खर्च केला. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन संचालक मंडळाला अकरा लाख रुपये 6 आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत (HC directs Marathi artists to pay Rs 11 lakh). त्यामुळे तत्कालीन कार्यकारणी मधील पदाधिकारी, संचालकांना मोठा झटका उच्च न्यायालयाने दिला आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेता प्रसाद सुर्वे, अभिनेता विजय पाटकर, मराठी अभिनेत्री अलका कुबल, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. या सर्वांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यात 2012-2013 दरम्यान मानाचा मुजरा हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी तत्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली होती. त्यावेळी सभासदांनी आक्षेप घेतला होता. जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत त्याची वसुली झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.