मुंबई - कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. तरीही मनसेने मनाई आदेश झुगारून दहीहंडी करत आहे. साकीनाका येथे क्रेनच्या साह्याने हंडी फोडण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्ते करत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
साकीनाका येथे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुषाली यांच्या आज नेतृत्वाखाली दहीहंडी साजरी करण्यात येणार होती. तशी तयारी देखील मनसैनिकांनी केली होती. मात्र पोलिसांनी याला विरोध केल्यानंतर मनसेने शक्कल लढवत क्रेनच्या सहाय्याने हंडी लावली. मात्र, पोलिसांना हे समजताच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांना न जुमानता लावली हंडी
राज्य सरकारने हंडी लावू नका असे सांगितले आहे. मात्र, तरीही मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार असा पवित्रा घेतला होता. पोलिसांनी दोन दिवसापासून मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या होत्या. तरीही त्याला न जुमानता मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी साकीनाका येथे हंडी लावली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन साकीनाका पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. व पुढील कारवाई सुरू असल्याचे साकीनाका पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -मुंबई सकाळपासून जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर