मुंबई -औरंगाबाद येथे आज (शुक्रवार) सकाळीच एका रेल्वे अपघातात 16 परप्रांतीय मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि स्तलांतरीत मजूर यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातच आता काँग्रस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक ट्वीट करत नव्या मुद्द्याला हात घातला आहे. 'आमचे सरकार गुजरातसह ओडीसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांतील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यास तयार आहे. परंतु तेथील राज्य सरकार या मजुरांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहे' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हेही वाचा...महाविद्यालयीन परीक्षांबाबत मोठा निर्णय, फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार
काय म्हणाले आहेत 'बाळासाहेब थोरात'
'मुंबईहून सम्बियाली (कच्छ) गुजरातला जाणाऱ्या 1200 गुजराती बांधवांच्या प्रवासाला गुजरात सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. याशिवाय ओडीसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांकडून स्थलांतरित मजुरांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, 'स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या गुजराती मजूर बांधवाच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही, हे दुर्दैवी आहे' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
एकूणच, राज्य सरकार स्थलांतरीत मजूरांच्या बाबतीत चांगले काम करत नाही, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. त्यातच भाजपशासित राज्य आणि महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांचे गृहराज्य असलेल्या गुजरात राज्याबाबतीत बाळासाहेब थोरात यांनी हा नवा मुद्दा समोर आल्याने, यावर चर्चा होऊ शकते.