मुंबई - महापालिकेत काही अधिकारी एकाच पदावर ठाण मांडून बसल्याची तक्रार अनेकवेळा समोर येते. आता अशा अधिकाऱ्यांची तक्रार खुद्द मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी अस्लम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांंकडे पत्राद्वारे केली आहे.
'त्या' अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा... पालकमंत्री अस्लम शेख याचे आयुक्तांना पत्र एकाच विभागात ठाणे
अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात संबंधित प्रकरणाचा उल्लेख केला आहे. ठराविक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी साभांळणाऱ्या महानगरपालिकेत हे प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत.
प्रभावीपणे काम करण्यासाठी बदली
कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत असल्याने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने व काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.