मुंबई - मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे आदींसंदर्भात तसेच या कामांमध्ये मुंबई महापालिका, पोलीस दल यांच्यामध्ये समन्वय वाढविण्याच्या अनुषंगाने आज (मंगळवार) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने आढावा बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व कामांच्या प्रगतीचीही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी, मुंबईतील महापालिका झोन्सचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘शहरातील कोविड केअर सेंटर्स, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्रे, आयसीयू सुविधा उपलब्ध असलेले सेंटर्स यांचे मॅपिग करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. खासगी, स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर्सची माहितीही या मॅपिंगमध्ये घेण्यात यावी. शिवाय खासगी केंद्रांकडे असलेली औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींची माहिती घेऊन प्रशासनाने त्यांना आवश्यक सहकार्य करावे,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.