मुंबई - एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीचा जीव तोच वाचवू शकतो ज्यांच्या मनात सद्भावना आणि प्रेम असते. आता हेच बघा ना...एक कावळा मरणाच्या दारात उभा होता मात्र, त्याची वेळ आलेली नव्हती. अचानक तो ग्रेस कुटुंबाच्या खिडकीत येऊन आदळला. या कुटुंबाने त्याला मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढले. त्यावर उपचार करून पुन्हा सोडून दिले. मात्र, मुक्या प्राण्यांना एकदा माणसाचा लळा लागला की, ते शेवटपर्यंत साथ देतात. हा कावळा देखील ग्रेस कुटुंबाला सोडून न जात त्यांच्याच घरात एक सदस्य म्हणून राहिला. असा हा कुकू कावळा आणि ग्रेस कुटुंबाच्या अनोख्या नात्याविषयी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
कावळ्याचे नाव ठेवले 'कुकू' -
भारतीय संस्कृतीमध्ये कावळ्याला एक विशेष मान आहे. कोणाचा मृत्यू झाला तर पिंडाला कावळा शिवला की नाही, याला महत्त्व दिले जाते. इतर वेळी मात्र, कोणीही कावळ्यांचा विचार करत नाही. मात्र, मुंबईच्या दादर परिसरातील ग्रेस कुटुंबाने एका कावळ्याला जीवदान तर दिले. दिव्यांग अवस्थेत असलेल्या या कावळाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आहे. त्यांनी या कावळ्याचे 'कुकू', असे नामकरण केले आहे.
कुकूचा एक डोळा निकामी -
दादरचा नायगाव परिसरात डायमंड ग्रेस आणि त्यांची पत्नी जॉर्ज ग्रेस राहतात. सप्टेंबर 2018 ला त्यांच्या बाल्कनीत जखमी अवस्थेत एक कावळा आला होता. त्या कावळ्याच्या एका डोळ्यात गंभीर दुखापत झालेली होती. जॉर्ज ग्रेस त्या कावळ्याला घरात घेऊन आले. त्याच्यावर उपचार करून नंतर सोडून दिले. मात्र, दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा तो बाल्कनीतून सरळ घरात आला. त्याच्या एका डोळ्यात जंतूसंसर्ग देखील झाला होता. तेव्हा ग्रेस दाम्पत्याने त्याला पशु वैद्यकाकडे नेले आणि त्याच्यावर उपचार केले. मात्र, तोपर्यंत त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता. तेव्हापासून हा कुकू ग्रेस यांच्याच घरात राहतो.
कुकू घर सोडून जात नव्हता -
कुकू दिव्यांग झालेला होता. त्याला एका डोळ्याने दिसत नव्हते. त्यामुळे तो बाहेर गेला असता तर त्याला खायला मिळाले नसते. इतकेच नव्हे तर त्याला दुसऱ्या कावळ्यांनी मारले देखील असते, अशी भीती आम्हाला होती. त्यालाही अशीच भीती असावी. त्यामुळे कुकू घर सोडून जात नव्हता. तेव्हापासून आमच्या घरातील तो एक सदस्य झाला. आतापर्यंत आम्ही कुकूचे दोन वाढदिवस साजरे केले आहेत, असे डायमंड ग्रेस सांगतात. कुकूची आम्हाला सवय लागली आहे. माझी पत्नी जॉर्ज ग्रेस घराबाहेर गेली तर जोरजोराने ओरडतो. आम्हाला नाईलाजास्तव व्हिडिओ कॉल करून तिचा आवाज कुकूला ऐकवावा लागतो, असेही डायमंड यांनी सांगितले.
कुकुची अनेक नावं -
ईस्टर ग्रेस यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, कुकूची सुरुवातीपासून मी देखरेख करत आहे. त्याला वेळेवर मेडिसीन आणि जेवण देतो. आम्ही त्याचे कुकू, चिकू, शोनूबाबा, असे अनेक नावं ठेवली आहेत. कुकू माझाबरोबर जेवतो. दिवसभर आमच्याशी गप्पा मारतो आणि खेळतो देखील. घरातील सदस्यांच्या अंगा-खांद्यावर येऊन बसतो. त्याला रागावलेले समजते. कुकूची स्वत:ची दिनचर्या आहे. तो सकाळी साडे सात वाजता उठतो. त्याच्या जेवणाच्या देखील वेळा ठरलेल्या आहेत. कुकुला मित्र सुद्धा आहे. बाल्कनीत कुकूचे मित्र असलेले एक कावळा आणि खारुताई दररोज येतात. त्यांच्याबरोबर कुकू दररोज खेळतो, असे ग्रेस यांनी सांगितले.