मुंबई - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून राज्यपालांनी केलेल्या विधानाचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यपालांवर संघाचे संस्कार झाल्याने त्यांना पदाचा विसर पडला आहे. राजकारणाची खुमखुमी असलेल्या राज्यपालांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.
हेही वाचा -मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावती शहरातील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण
राज्यपालांना राजकारणाची खुमखुमी
राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत, ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो, तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु, कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली विधाने त्यांच्या विशिष्ट राजकीय विचारधारेतूनच आलेली आहेत. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारातून ते राज्यपाल पदावर असतानाही बाहेर आलेले दिसत नाहीत. राज्यपाल पदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत, असेही पटोले म्हणाले.
केंद्राने परत बोलवावे
राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे, परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहमंत्रालयाने कोश्यारी यांना परत बोलावावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
राज्यपालांचे विधान भारत देशाचा अवमान करणारे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून केलेले विधान हे चुकीचे व निषेधार्ह आहे. शांततेचा पुरस्कार करणे म्हणजे कमकुवतपणा नसतो, त्यासाठी मौठे धैर्य लागते. देशाची ७० वर्षांत झालेली प्रगती, तसेच भारत स्वातंत्र्यानंतर आत्मनिर्भर म्हणून जगात ताठ मानेने उभा राहिला तो नेहरू यांच्या सक्षम, कणखर नेतृत्वामुळेच, परंतु पंडित नेहरूंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिकवले जातात, तो नेहरूद्वेषच राज्यपालांच्या बोलण्यातून व्यक्त झाला आहे. राज्यपालांचे हे विधान देशासाठी बलिदान देणारे व समस्त भारत देशाचे अवमान करणारे आहे. या विधानाबद्दल कोश्यारी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
अत्यंत चुकीचे व जाणीवपूर्वक केलेले वक्तव्य
पंडित नेहरू ते डॉ. मनमोहनसिंह यांच्या दूरदर्शी, सक्षम नेतृत्वामुळेच देश उभा राहिला आहे. वाजपेयी सरकार आधीच देशाने अणू कार्यक्रमाची पायाभरणी केली होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लष्करी ताकद किती होती आणि त्यानंतर पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात देश लष्कराच्या बाबतीत सामर्थ्यवान बनला हे त्यांना दिसले नाही. अमेरिका व रशिया या दोन बलाढ्य जागतिक शक्तींना न जुमानता अणू कार्यक्रम राबविले. इंदिरा गांधींच्या सक्षम नेतृत्वाने पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला. हे कोश्यारी यांना माहित नाही का? अटलबिहारी वाजपेयी यांनीही पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता सुरू केली होती. वाजपेयी पाकिस्तानबरोबर शांतीवार्ता करत असतानाच पाकिस्ताने कारगिल युद्ध घडवून आणले, मग वाजपेयी यांच्या शांततेच्या वाटाघाटी कमकुवतपणाचे लक्षण म्हणायचे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानने वारंवार सीमेवर हल्ले केले. पुलवामा हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तान कुरापती करत असतानाही नरेंद्र मोदी अनाहूतपणे पंतप्रधान नवाज शरिफ यांना त्यांच्या वाढदिवशी पाकिस्तानात जाऊन भेटले. तेही कमकुवतपणाचे लक्षणच म्हणायचे का? अहिंसा हे जगातले सर्वात मोठे हत्यार आहे, असे महात्मा गांधी यांनी म्हंटले होते. अहिंसेच्या मार्गानेच इंग्रजांना हरवले, मग महात्मा गांधी कमकुवत होते, असे कोश्यारी यांना म्हणावयाचे आहे का? असा सवाल उपस्थित करत वाजपेयी यांच्या आधीची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नव्हती, हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंतच्या सर्व सरकारांचे देशाच्या विकासात, प्रगतीत दिलेले योगदान नाकारणारे त्यांचा अपमान करणारे आहे. कोश्यारी यांचे विधान अत्यंत चुकीचे व जाणीवपूर्वक केलेले आहे, अशी विधाने राज्यपालपदावरील व्यक्तीला शोभा देत नाहीत, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा -अमरावतीत भाजपने कृषी मंत्र्यांना दाखविले काळे झेंडे, ताफा अडविण्याचाही प्रयत्न