मुंबई: विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत ( Assembly Speaker Election ) भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली ( Petition Dismissed By BHC ) आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता तरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. राज्यपालांनी आता तरी विधानसभा अध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( INC State President Nana Patole ) यांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आता तरी राज्यपालांनी निर्णय घ्यावा : नाना पटोले भाजपकडून जाणीवपूर्वक अडथळा
विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत जाणीवपूर्वक कोर्टात जाऊन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीच्या तारखेबाबत स्पष्टता आणत नाहीत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आतापर्यंत दोन वेळा महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांना भेटले. मात्र, अद्यापही राज्यपालांकडून तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. 9 मार्चला विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती राज्यपालांना केली होती. मात्र, अद्याप राज्यपालांनी याबाबत कोणतेही उत्तर दिलं नाही. पण लवकरच राज्यपाल अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील असा विश्वास नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.
गिरीश महाजन यांचे याचिकेचे डिपॉझिट जप्त
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि नेते गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळली असून, याचिका दाखल करताना दहा लाख रुपये दिलेले डिपॉझिटही मुंबई उच्च न्यायालयाने जप्त केले आहे. न्यायालयाची ही भारतीय जनता पक्षाला चपराक असल्याचे मत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केलं.