मुंबई - राजभवन हा राजकीय अड्डा झाला आहे आणि राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे नेते त्यांना भेटतात. दरम्यान, राजभवन हा राजकीय अड्डा झाला असल्याने अशा गाठीभेटी सुरू असतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावल आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया आज (गुरुवार) राज्यपाल यांची भेट घेणार आहेत, या भेटी संदर्भात बोलताना मलिक यांनी हा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल हे भाजपचा अजेंडा चालवत आहेत असा आरोपही केला आहे.
'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत'
आज भारतीय जनता पक्षाचे काही नेते राज्यपालांना भेटणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर प्रतिक्रिया देत असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपालांवर मलिक यांनी वरील टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचे दुमत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.