मुंबई - महाविकास आघाडीने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचे पत्र देऊन 3 महिने उलटून गेले. तरी अद्याप राज्यपाल त्या पत्रावर सही करायला तयार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात संविधानिक पेच निर्माण होणार असल्याच मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपाल घटना विरोधी वागत असल्याचा आरोप ही यावेळी नाना पटोले यांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्ष असताना विधिमंडळ समित्या तयार केल्या होत्या. पण राज्यपाल नियुक्त सदस्य अजूनही केले जात नाहीत. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज संविधानिक आहे की नाही हे देखील तपासावे लागेल, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. राज्यपालांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात संविधानिक पेच ही निर्माण होऊ शकतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर केंद्र सरकार मारत आहे डल्ला-
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली येत आहेत. त्यानुसार पाहता इंधनाची किंमती कमी करून डिझेल २५ रुपये आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे. मात्र सध्याचे इंधनाचे दर पाहता पेट्रोलचे दर १००च्या वर गेले आहेत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर केंद्र सरकार डल्ला मारत आहे. मूठभर उद्योगपती मित्रांना नफा पोहचवण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल-
येणाऱ्या काळात इंधनाच्या किंमती कमी झाल्या नाहीत तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाद्याक्ष पदाची धुरा ऑगस्ट क्रांती मैदानात स्वीकारली. तसेच तिथे असलेल्या तेजपाल हॉलमध्ये "मोदी सरकार चेल जावं"चा नारा दिला होता.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण-
प्रकरणामध्ये सध्या पोलीस तपास करत आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल, असे देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.
हेही वाचा-पेट्रोलची शंभरी; राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, नागरिक संतप्त