महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांसाठी ‘अमृत’ प्रशिक्षण संस्था स्थापणार ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी ‘अमृत’ ही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

By

Published : Aug 20, 2019, 11:45 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी ‘अमृत’ ही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training- AMRUT ) स्थापन करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या मुला-मलींना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षित करणे, त्यांच्यात उद्योजकतेचा विकास करणे, व्यक्तिमत्व विकास करणे इत्यादी उपक्रम प्राधान्याने राबवणार आहे.

आर्थिक मागासांसाठी ‘अमृत’ प्रशिक्षण संस्था स्थापणार

केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी हे आरक्षण राज्यातही लागू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने ठरवले. त्यानुसार राज्यात हे आरक्षण लागू झाले आहे. या आरक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या पुढाकाराने 'अमृत' ही संस्था स्थापन करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे राहणार आहे. या संस्थेची नोंदणी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 8 अन्वये करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारने अनुसूचित जातीतील तरुण तरुणींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 'बार्टी' तर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने 'सारथी' ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्गासाठी 'महाज्योती' ही संस्था स्थापन झाली आहे. आता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील तरुण-तरुणींनाही नोकरी, रोजगार, व्यक्तिमत्व विकासासह सर्वांगिण विकास साधण्यासाठी ही संस्था प्राधान्याने काम करेल.

‘अमृत’ ही संस्था खालीलप्रमाणे काम करेल-

1. खुल्या प्रवर्गाची आणि विशेषत: आर्थिकदृष्टया मागासवर्गीयांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध सर्वेक्षणे करणे

2. स्वयंरोजगार व रोजगारासाठी प्रशिक्षण व अन्य प्रकारची मदत उपलब्ध करुन देणे

3. उद्योग, व्यवसाय यांची स्थापना करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे

4. समुपदेशन करणे तसेच हेल्पलाईन सुरु करणे

5. स्पर्धा परिक्षांसाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षित करणे

6. महिलांचे सक्षमीकरण

7. शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती प्रदान करणे

ABOUT THE AUTHOR

...view details