महाराष्ट्र

maharashtra

शाळांची घंटा वाजणार उशिरा: १७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती

By

Published : Aug 12, 2021, 12:21 PM IST

Updated : Aug 12, 2021, 12:38 PM IST

लहान मुलांना लस उपलब्ध नसल्याने राज्यातील शाळा सुरू करण्यास संमती देऊ नये, असे मत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडले. बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळत आहेत. तसेच इंडोनेशियामध्येही लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याच्या जीआरला स्थगिती दिली.

Government Stay On Education Ministry GR
मंत्रालय

मुंबई - कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र तरी लहान मुलांना लस उपलब्ध नसल्याने राज्यातील शाळा सुरू करण्यास संमती देऊ नये, असे मत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुधारित व विस्तृत अध्यादेश तात्काळ काढावेत, असे निर्देश यावेळी दिले. दरम्यान, 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. टास्क फोर्सने याला विरोध दर्शवल्याने तूर्तास शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.

बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळत आहेत. तसेच इंडोनेशियामध्येही लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स समितीची बैठक आज झाली. शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारीही आजच्या बैठकीला उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकदम शाळा उघडणे ठरणार अडचणीचे

राज्यात १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले होते. टास्क फोर्सने त्या आदेशाला विरोध केला. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम शाळा उघडल्या तर ते अडचणीचे होईल, अशी भीती टास्क फोर्सने यावेळी वर्तवली आहे.

रुग्ण स्थितीचा आलेख तपासणार

ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल का ते तपासले जाईल. नंदुरबार, धुळे, लातूर, अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करता येतील. पण हे जिल्हे किंवा अशी शहरे अपवाद असतील. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अद्यापही कमी होत नाही, किंवा नियंत्रणात येत नाही, असे त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट शाळा लगेच सुरू करता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा आजच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Last Updated : Aug 12, 2021, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details