मुंबई -नव्या उमेदीच्या तरुणांच्या स्टार्टअप्सना अत्यावश्यक असलेले पेटंट मिळवून देण्यासाठी शासनाकडून १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. मंत्रालयात नव्या योजनांची माहिती देताना मलिक यांनी ही घोषणा केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसीत केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. अनेकदा नाविन्य असूनही पेटंट मिळत नाही. त्यामुळे राज्यातील अशा तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
पात्रतेच्या अटी-
ही योजना युटिलिटी पेटंट, इंडस्ट्री डिझाईन पेटंट, कॉपीराइट्स (संगणक कोडपुरते मर्यादित) आणि ट्रेडमार्क अर्जांची पूर्तता करेल. अर्जदार हा भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत असावा, देशांतर्गत पेटंटचे एकूण वार्षिक उत्पन्न स्थापनेपासून १ कोटी रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच आंतरराष्ट्रीय पेटंटचे एकूण वार्षिक उत्पन्न स्थापनेपासून ५ कोटी रुपयांपेक्षा कमी असावे. स्टार्टअप्सने उभारलेला निधी ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास ८० टक्के ऐवजी एकूण खर्चाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत नाविन्यता सोसायटी अर्थसहाय्य करेल.
स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही २ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य-
स्टार्टअप्ससाठी आणखी एका योजनेची मलिक यांनी घोषणा केली. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा एक विशिष्ट मूलभूत खर्च आहे. एखादे नवीन उत्पादन किंवा सेवा पुरवित असलेल्या कोणत्याही स्टार्टअपला त्यांचे उत्पादन किंवा सेवेची लॅबमधून चाचणी करून घेणे आवश्यक असते. अशा चाचण्यांसाठी आवश्यक निधी प्रारंभिक टप्प्यात अनेक स्टार्टअप्स उभारू शकत नाहीत. अशा स्टार्टअप्सना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राच्या खर्चासाठी २ लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढे अर्थसहाय्य करण्यात येईल. या चाचण्या केवळ एनएबीएल/बीआयएस प्रमाणित प्रयोगशाळेतून करणे अनिवार्य असेल. राज्यातील साधारण २५० स्टार्टअप्सना या योजनेतून मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.