मुंबई- दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची अचानक भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ राज्यातील विषयावरच चर्चा झाल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.
सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास चाललेल्या भेटीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना केला. राज्यपालांनी पवार साहेबांना चहासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे आज ही भेट ठरली होती. ही भेट चांगली झाली असून अनेक चांगल्या विषयावर चर्चा झाली.