मुंबई -गोरेगाव येथील उघड्या गटारात बुडालेल्या दिव्यांश सिंह याचा २ दिवस शोध घेऊनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यातच पालिका आणि अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवल्याने संतप्त रहिवाशांनी महापौरांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला.
दिव्यांशचा शोध थांबवल्याने गोरेगावमधील रहिवाशी संतप्त, मोर्चा काढत महापौरांच्या राजीनाम्याची केली मागणी - Municipal Administration
दिव्यांशचा शोध घेण्याचे थांबवल्याने गोरेगावमधील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
गोरेगाव येथील आंबेडकर चौकाजवळच्या उघड्या गटारात दिव्यांश सिंह हा दीड ते दोन वर्षीय मुलगा बुधवारी रात्री पडला. गटारात पडताच पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून बुधवार रात्री पासून त्याचा शोध घेतला जात होता. त्यासाठी गटार बंदिस्त करण्यासाठी टाकण्यात आलेले सिमेंट काँक्रीट तोडण्यात आले. दिव्यांश ज्या गटारात पडला ते गटार ज्या नाल्याला जाऊन मिळते त्या नाल्यातही शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत दिव्यांशचा शोध लागला नाही म्हणून शोध मोहीम थांबण्यात आली.
दिव्यांशचा शोध घेण्याचे थांबवल्याने येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दिव्यांश ज्या गटारात पडला त्या गटारावर झाकण नसल्याने या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात होती. मात्र, त्यानंतरही गेल्या ३ दिवसात कोणावरही कारवाई न केल्याने आज संतप्त रहिवाशांनी आंबेडकरनगर पासून पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महापौर आणि सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.