महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपेक्षा लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद - Mumbai Vaccination News Update

1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होऊन 15 दिवसच झाले असताना, त्यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणात मागे टाकले आहे. मुंबईत सर्वाधिक जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद
लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद

By

Published : Mar 16, 2021, 6:35 PM IST

मुंबई - मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होऊन 15 दिवसच झाले असताना, त्यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणात मागे टाकले आहे. मुंबईत सर्वाधिक जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

लसीकरणासाठी वयोवृद्धांचा पुढाकार

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर तर तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटामधील नागरिकांना लस देण्यात येत आहे. 26 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 6 लाख 47 हजार 684 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 5 लाख 66 हजार 090 लाभार्थ्यांना पहिला तर 81 हजार 594 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. त्यात एकूण 1 लाख 98 हजार 711 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 36 हजार 288 फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. गेल्या 15 दिवसात 2 लाख 75 हजार 618 जेष्ठ नागरिकांना तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 37 हजार 067 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. गेल्या दोन महिन्यात जितक्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली त्यापेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांनी लसीकरणाला गर्दी करून, लस घेतल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

असे झाले लसीकरण -

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 4 लाख 20 हजार 763 लाभार्थ्यांना पहिला तर 69 हजार 465 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 लाख 90 हजार 228 लाभार्थ्यांना डोस देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत 19 हजार 152 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 931 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 22 हजार 083 लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 1 लाख 26 हजार 175 लाभार्थ्यांना पहिला तर 9 हजार 198 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 35 हजार 373 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणावर भर

मुंबईत कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणाचा आकडा वाढवून कोरोनाचा प्रसार कमी केला जाऊ शकतो. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या रोज 40 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. मात्र हेच उद्दिष्ट वाढवून दररोज 1 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लस देण्याचे अधिकार दिले आहेत. खासगी रुग्णालयांना 24 तास लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली असून, 250 रुपये लसीकरणासाठी शुल्क आकारले जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 1,98,711
फ्रंटलाईन वर्कर - 1,36,288
जेष्ठ नागरिक - 2,75,618
45 ते 59 वयोगट - 37,067
एकूण - 6,47,684

ABOUT THE AUTHOR

...view details