मुंबई- राजधानी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या महिनाभरात पडलेल्या पावसामुळे तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
मुंबईमध्ये यावर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या दिवसात सुरू झालेला पाऊस काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पडत आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे महिनाभरातच मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तलावांमध्ये पाणीसाठा -
अप्पर वैतरणामध्ये 56 हजार 410, मोडक सागरमध्ये 1लाख 28हजार 925, तानसामध्ये 1 लाख 44 हजार 122, मध्य वैतरणामध्ये 1 लाख 89 हजार 31, भातसामध्ये 5 लाख 78 हजार 296, विहारामध्ये 25 हजार 260, तुलशीमध्ये 8 हजार 46 अशा सात तलावांमध्ये एकूण 11 लाख 30 हजार 90 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.