मुंबई - बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण म्हणून मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीबागेची ओळख आहे. पक्षी, प्राणी, पेंग्विन पाहण्यासाठी बच्चे कंपनीची याठिकाणी मोठी गर्दी होते. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात राणीबागेत प्रवेश बंद करण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने राणीबाग येत्या १ नोव्हेंबरपासून उघडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
१ नोव्हेंबरपासून राणीबाग सुरू
गेल्या वर्षी जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. मुंबईसह भारतातही गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यानंतर काही दिवसांतच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून मृत्यू होऊ लागले आहेत. (२३ मार्च २०२०)पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे राणीबाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारी २०२१ पासून उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. मात्र, कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने ४ एप्रिलपासून पुन्हा उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्ण आटोक्यात आली असून, अनेक निर्बंधही शिथील करण्यात आल्याने आणखी काही दिवस खबरदारी म्हणून थांबून १ नोव्हेंबरपासून राणीबाग सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले आहे.
दररोज दीड लाखाचा महसूल बुडतोय
राणीबाग गेल्या काही वर्षात पेंग्विनसह अनेक प्राणी-पक्षी आणल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामध्ये दररोज पाच ते सहा हजार पर्यटक येतात. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या बारा ते पंधरा हजारांपर्यंत जाते. गेल्या काही वर्षांत झालेल्या सुधारणांमुळे ही संख्या वाढतच आहे. पर्यटक वाढल्याने उद्यान व प्राणी संग्रहालयाला दररोज सुमारे दीड लाखांचे, महिन्याला ४५ लाखांचे तर वर्षाला ८ ते १० कोटी उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून उद्यान बंद असल्याने दररोज दीड लाखाचे नुकसान होत आहे. त्यामुळे उद्यान सुरू झाल्यास पालिकेला पुन्हा मोठा महसूल मिळणार आहे.
असा आहे आराखडा -
- उद्यानाचा परिसर आणि मोकळी जागा पाहता दिवसाला दहा हजार पर्यटक आले तरी टप्प्याटप्प्याने प्रवेश दिल्यास गर्दी होणार नाही.
- गर्दीवर नियंत्रण आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० सुरक्षा रक्षकांची टीम तैनात.
- जागोजागी सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. प्राण्यांचे निवासस्थान ग्लासने बंदिस्त असल्याने निकट संपर्क टळणार.
- मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. दोन डोस असल्यास प्राधान्य. गर्दी झाल्यास गेट बंद करणार.
हेही वाचा -फडणवीसांना त्यांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच कळलेले नाही, सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार