मुंबई -कोरोनाचा कहर राज्यात वाढतच चालला आहे. आता दिवसाला 8000हून रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे राज्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र त्याचवेळी एक दिलासादायक बाब एक आहे, की रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 95.96 टक्के (आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 23 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारी प्रमाणे) असून जिल्हानिहाय विचार करता गोंदिया जिल्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक 98.35 टक्के असा आहे. तर त्यापाठोपाठ गडचिरोलीचा 97.88 टक्के तर अहमदनगरचा दर 97.95 टक्के असा आहे. त्याचवेळी मुंबई मात्र रुग्ण बरे होण्याच्या क्रमवारीत 25व्या क्रमांकावर आहे. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचा दर 94.25 टक्के असा आहे.
या 'त्रिसूत्री'मुळे रुग्ण बरे
मार्चमध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि पुढे रुग्ण वाढीचा आलेख वाढतच गेला. हा आजार नवीन असल्याने आणि त्यावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने, निश्चित अशी उपचार पद्धती नसल्याने सुरुवातीला रुग्णांचा शोध आणि उपचार देणे अवघड झाले. त्यामुळे मृत्यू दर वाढता राहिला. पण पुढे मात्र टेस्ट-ट्रेसिंग-ट्रिटमेंट ही त्रिसूत्री अवलंबण्यात आली आणि ती यशस्वी ही ठरली. तर दुसरीकडे इतर आजारावरील रेमडेसिविरसारखे औषधे ही लागू होऊ लागली. प्लाझा थेरपीही बऱ्यापैकी फायद्याची ठरली. तर ट्रेसिंग-टेस्टिंगमुळे रुग्णांना लवकर शोधत त्यांना वेळेत उपचार देता येणे शक्य होऊ लागले. या आणि सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनाचा एकत्रित परिणाम म्हणून आज मृत्यूदर हळूहळू कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा रुग्णवाढ वाढली असली तरी गंभीर रुग्णांचा आकडा तितका मोठा नसून ही दिलासादायक बाब आहे.
रुग्ण बरे होण्यात हे जिल्हे आघाडीवर
- महाराष्ट्रात आतापर्यंत (23 फेब्रुवारी) 21 लाख 21 हजार 119 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर यातील 20 लाख 8 हजार 623 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचवेळी 51 हजार 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूणच 23 फेब्रुवारीनुसार राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 95.96 टक्के असा आहे. असे असताना गोंदिया जिल्ह्याचा हा दर मात्र राज्यापेक्षा अधिक चांगला आहे. गोंदियात 98.35 टक्के कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
- 6900 गोंदियात आतापर्यंत14 हजार 520 रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर यातील14 हजार 272 रुग्ण बरे झाले असून 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे केवळ 69 रुग्ण सक्रिय आहेत. गोंदियानंतर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर असून येथे 8 हजार 960 रुग्ण आढळले आहेत. यातील 8 हजार 769 रूग्ण बरे झाले असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीचा रूग्ण बरे होण्याचा दर 97.88 टक्के असा आहे.
- तिसऱ्या क्रमांकावर अहमदनगर जिल्हा असून येथे 74 हजार 535 रुग्ण आढळले आहेत. यातील 72 हजार 274 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 हजार 128 जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.25 टक्के असा आहे. नाशिकचा दर 97.13 टक्के, पालघरचा 97.01 टक्के, चंद्रपूरचा 96.92 टक्के, रायगडचा 96.65 टक्के, कोल्हापूरचा 96.24 टक्के, भंडारा 96.06 टक्के आणि जळगाव 96.04 टक्के असा रुग्ण बरे होण्याचा दर आहे. या सर्व जिल्ह्याचा दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त असून ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. मात्र त्याचवेळी अमरावती, अकोला, नागपूर, बुलडाणा येथे 81 ते 90 टक्क्यांच्या आत हा दर आहे.
कोरोना पुन्हा नियंत्रणात येईल?
अमरावतीचा दर 81.15 टक्के, अकोल्याचा 82.18 टक्के, बुलडाण्याचा 88.55 टक्के आणि वाशिमचा 90.80 टक्के असा दर आहे. मुंबईतील 94.25 टक्के रुग्ण बरे रुग्ण बरे होण्याच्या क्रमवारीत मुंबई 25व्या क्रमांकावर आहे. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 21 हजार 699 रुग्ण आढळले आहेत. तर यातील 3 लाख 2 हजार 473 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई 25व्या क्रमांकावर असली तरी रुग्ण बरे होण्याचा दर ही वाढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून योग्य अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने ट्रेसिंग-टेस्टिंग करत रुग्णांना वेळेत ट्रिटमेंट दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईत कोविड सेंटर उभारत तिथे चांगल्या प्रकारे रुग्णांना उपचार दिले जात आहेत. तेव्हा लवकरच रुग्ण बरे होण्याचा दर वाढेल आणि कोरोना पुन्हा नियंत्रणात येईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.