मुंबई -शारदीय नवरात्र उत्सवाचा (Navratri 2022) प्रारंभ अश्विन शुल्क प्रतिपदेपासून होत आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना (Ghatasthapana for Navratri festival) केली जाते. नवरात्रीचे व्रत करुन दुर्गा मातेची पूजा केली जाते; घटस्थापनेलाच कलश स्थापना म्हटले जाते. पंचांगानुसार, अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या तिथीला म्हणजेच २६ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत असून, ५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. ४ ऑक्टोबर रोजी नवमी पूजन केले जाणार आहे. यंदा अतिशय विशेष आणि शुभ मानल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये असा योगायोग घडला आहे, तो म्हणजे नवरात्र संपूर्ण ९ दिवस साजरे केले जाणार आहे. नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. यंदाच्या नवरात्रीत ९ दिवसांत अनेक शुभ योगही (timings rituals and materials required) तयार होत आहेत.
सणाला आले उत्सवाचे स्वरुप : महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. अनेक राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे. या उत्सवात हिंदूंना देवीतत्त्वाचा लाभ होतो. मात्र हल्ली नवरात्रोत्सवाला आलेल्या विकृत स्वरूपामुळे त्यातून देवीतत्त्वाचा लाभ तर दूरच; पण त्याचे पावित्र्यही घटले आहे. या उत्सवातील अनुचित प्रकार रोखून त्याचे पावित्र्य राखणे, गरजेचे आहे.
घटस्थापणा मुहुर्त : यावर्षी आश्विन नवरात्री सोमवार म्हणजे २६ सप्टेंबर २०२२ रोजी घटस्थापना होईल. प्रतिपदा तिथी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ११ मिनिटांपासून ते ०७ वाजून ३० मिनिटे आणि पुन्हा सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत नवरात्री घटस्थापना करणे खूप शुभ राहील. जर या विशेष शुभ मुहूर्तावर कलश बसू शकत नसेल, तर अभिजित मुहुर्तावर म्हणजे सकाळी ११ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे या वेळेत कलशपूजन केले जाऊ शकते.
घटस्थापनेचे साहित्य :नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड लागते. त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके, विविध प्रकरची धान्ये, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षता साठी तांदुळ, आंब्यांची डहाळी (आंब्याची पाने), पैशांची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फळे, फुले, श्रृंगार पेटी, फुलांचे हार, इत्यादी साहीत्य लागत असते.
घटस्थापनेचा विधी :सकाळी स्नान करुन पाटावर लाल कापड मांडून त्यावर रांगोळी काढा. त्यानंतर त्यावर टोपली ठेवून त्यात माती भरा. मातीत विविध प्रकारची धान्य पेरुन त्यावर थोडे पाणी शिंपडा. त्यानंतर मातीच्या लहान मडक्यात पाणी भरुन त्यात अक्षता, फुले,पान सुपारी,नाणी टाका. त्यानंतर त्यात आंब्याची पाच पाने ठेवा. आंब्यांच्या पानाच्या मधोमध नारळ ठेवा. नाराळाला हळद कुंकू वाहून, फुले वाहून नारळाच्या डोक्यावर फुले किंवा काही जणांमध्ये वेणी घालण्याची प्रथा आहे. अशाप्रकारे दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करून घटस्थापना करावी.
घटस्थापना करताना म्हणा ‘हे’ मंत्र :देवीची स्थापना केल्यानंतर देवीचे ध्यान करावे. आणि 'खड्गं चक्र गदेषु चाप परिघांछूलं भुशुण्डीं शिर:, शंखं सन्दधतीं करैस्त्रि नयनां सर्वांग भूषावृताम। नीलाश्मद्युतिमास्य पाद दशकां सेवे महाकालिकाम, यामस्तीत स्वपिते हरो कमल जो हन्तुंमधुं कैटभम।।
- सर्वस्वरुपे,सर्वेशे सर्व शक्ती समन्विते| भसेत्भयस्त्राहि नो देवि दुर्गे देवी नमोस्तुते ||
- लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्र्ध्दे पुष्टिस्वधे ध्रुवे|महारात्रि महालक्ष्मी नारायणी नमोस्तुते||
-ओम वागिश्वरी महागौरी गणेश जननी शिवे|विद्यां वाणिज्य बुद्धींदेही मे परमेश्वरी ||, असा मंत्र म्हणावा.
पूजेचे महत्त्व :जगात जेव्हा जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा. तसेच नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने, सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा. Navratri 2022