मुंबई -कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत आहे. विषाणूमध्ये झालेला बदल आणि त्याचा प्रसार याची माहिती जिनोमिक सिक्वेंसिंग चाचण्यांमधून समोर येते. सध्या या चाचण्या पुण्यामध्ये एनआयव्ही प्रयोगशाळेत केल्या जातात. अशीच प्रयोगशाळा महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू केली जाणार आहे. यासाठी लागणारे यंत्र मुंबईत आले असून कस्टम क्लिअरिंगनंतर दोन दिवसांत ते कस्तुरबा रुग्णालयात आणले जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतच जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा -राजकारणाची खुमखुमी असलेल्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा - नाना पटोले यांची मागणी
विषाणूच्या बदलाची माहिती
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत रुग्णांची संख्या कमी झाली. याच दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आलीय. गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूने आपले रूप बदलले आहे. विषाणू आपले रूप बदलत असताना तो अधिक घातक झाला. पाहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत अधिक रुग्ण आढळून आले. कोरोना विषाणू आपले रूप बदलतो आणि तो किती लोकांमध्ये पसरला आहे, हे जिनोमिक चाचण्यांमधून समोर येते. यासाठी मुंबईमधून दर आठवड्याला ५० सॅम्पल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवले जातात. मात्र, पुण्याच्या एनआयव्ही प्रयोग शाळेवर कामाचा ताण असल्याने चाचण्यांचा अहवाल येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यामुळे एखाद्या विभागात रुग्णसंख्या वाढत असताना तो नेमक्या कोणत्या विषाणूमुळे वाढत आहे, त्या विभागात किती लोकांना त्याची लागण झाली आहे. याची माहिती वेळेवर मिळत नाही. यासाठी मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात जिनोमिक सिक्वेसिंग चाचण्या करणारे यंत्र सिंगापूर येथून मागवले आहे. हे यंत्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत येणार होते. मात्र, परदेशातून कार्गो सर्व्हिसला परवानगी नसल्याने हे यंत्र परदेशातच अडकले होते. हे यंत्र मुंबई विमानतळावर आले असून बुधवारी किंवा गुरुवारी कस्टम क्लिअरन्स झाल्यावर ही मशीन पालिकेच्या ताब्यात आल्यावर ती कस्तुरबा रुग्णालयात आणली जाईल. कस्तुरबा रुग्णालयात हे यंत्र आणल्यावर दोन ते तीन दिवस त्याची चाचणी केली जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतच जिनोमिक सिक्वेसिंगच्या चाचण्या केल्या जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.
कस्तुरबा रुग्णालयात लॅब