मुंबई - धारावी शाहू नगर येथील चाळीमध्ये 29 ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले होते. त्यांना पालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 जणांची प्रकृती गंभीर असून 5 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
धारावी गॅस सिलिंडर स्फोट, मृतांची संख्या 5 वर; 3 अद्यापही गंभीर - मुंबई गॅस सिलिंडर स्फोट
धारावी शाहू नगर येथील चाळीमध्ये 29 ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले होते. त्यांना पालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 जणांची प्रकृती गंभीर असून 5 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
सिलिंडर स्फोट, 17 जखमी -
धारावी शाहूनगर येथे एका चाळीत २९ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होत होती. गॅस गळती होत असल्याने त्या घरातील व्यक्तीने सिलिंडर घरासमोरील गल्लीत मोकळ्या जागेत आणून ठेवला. मात्र या सिलिंडरमधून गॅस गळती होत असल्याने गॅसचा आगीशी संपर्क होऊन स्फोट झाला होता. त्यामध्ये 17 जण जखमी झाले होते. त्यापैकी 5 जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते.
5 जणांचा मृत्यू -
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, गंभीर जखमी असलेल्या सोनू जैस्वाल (8 वर्ष) या लहान मुलाचा 31 ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सितारादेवी जैस्वाल (40 वर्षीय महिला) यांचा, तर अंजु गौतम (28 वर्षीय महिला) यांचा 3 सप्टेंबर रोजी आणि शौकत अली (35 वर्ष) व फिरोज अहमद (36 वर्ष) यांचा 5 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 वर पोहचली आहे.
3 अद्यापही गंभीर -
या दुर्घटनेत उर्वरित 12 जणांपैकी 4 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 8 जण अद्यापही रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून 5 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.