मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे उत्सव निर्बंधांमध्ये साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे मागील वर्षीपेक्षा स्थापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची संख्या वाढली आहे. मुंबईत कृत्रीम तलावात मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार मूर्तींचे विसर्जन कमी झाले आहे. यामुळे मुंबईकर भाविकांनी यंदा कृत्रिम तलावाला कमी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे (Ganesh visarjan 2022).
मूर्ती वाढल्याकृत्रिम तलावाला प्रतिसाद कमी - मुंबईमध्ये ३१ ऑगस्टला लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली. भाविकांकडून बाप्पाचे मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर दीड, पाच, सहा, सात आणि दहा दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसात १ लाख ९३ हजार ६२ घरगुती, सार्वजनिक गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यापैकी ६६ हजार १२७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागीलवर्षी म्हणजेच २०२१ मध्ये १ लाख ६५ हजार ४० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ८२ हजार ६१ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी स्थापना करण्यात आलेल्या मूर्तींचे संख्या वाढली आहे. तर कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या घटली आहे (immersion in artificial ponds decreased in Mumbai).