मुंबई - गँगस्टर एजाज लकडावाला याला सोमवारी गुन्हे शाखेने तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. या अगोदरच्या दोन्ही गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या सुनावणीत न्यायालयाने एजाज लकडावाला याला 10 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा गुन्हे शाखेने, एका बांधकाम व्यावसायिकाला धमकवल्याप्रकरणी लकडावालाला अटक केली आहे.
कोण आहे गँगस्टर एजाज लकडावाला ?
एजाज लकडावाला हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसह काम करत होता. 1992 मध्ये छोटा राजन हा दाऊद इब्राहिम पासून वेगळा झाला. त्यानंतर एजाज लकडावाला छोटा राजनसह काम करू लागला. 1992 ते 2008 या दरम्यान एजाज लकडावाला याने मुंबईतील विविध व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि खंडणीसाठी धमकावणे यासारखे 27 गंभीर गुन्हे एजाज लकडावालाच्या नावावर दाखल आहेत. त्याच्या विरोधात 80 तक्रार अर्ज सुद्धा दाखल झालेले आहेत.