मुंबई - पूर्व उपनगरातील पवई तलाव येथे मित्राला भेटण्यासाठी आलेल्या एका २७ वर्षांच्या विवाहित महिलेवर तिच्या मित्रासह इतर २ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. यानंतर तिघांवरही पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने पीडितेचा मित्र आकाशला साकिनाका येथील संघर्षनगर परिसरातून अटक केली. चौकशीत त्याने तिला रात्रीच्या वेळेस तिथे बोलावून निर्जनस्थळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. तसेच अन्य दोघांनी त्याच्यासमोरच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. इतर २ आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पवई पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरून दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.