मुंबई - प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. पण परळ येथील वाडीया रूग्णालयातील बालकर्करूग्णांनी एका अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले आहे. या लहान मुलांनी स्वतःच्या हातांनी चक्क चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करा...असा संदेशही यावेळी या मुलांनी दिला आहे.
वाडीया रुग्णालयात बाल कर्करुग्णांचा उत्साह; साकारले ‘चॉकलेटचे बाप्पा’... - चॉकलेट गणपती न्यूज
गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांत जास्त उत्सुकता असते ती म्हणजे बच्चे कंपनीला...बाप्पाचं स्वागत करण्यासाठी ही लहान मुलं नेहमीच आघाडीवर असतात. पण कर्करोग झालेल्या अनेक लहान मुलांना इच्छा असूनही आजारपणामुळे हा सण उत्साहाने साजरा करता येत नाही. वाडीया रूग्णालयात 1 फुटी चॉकलेट गणेशमुर्तीची स्थापना केली व मुलांकडून ही छोटे बाप्पा चॉकलेट द्वारे बनवून गणपतीचं आयोजन करण्यात आले होते.
या मुलांना खेळण्याच्या वयात कर्करोगाचं निदान झाल्यानं या मुलांना किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या वेदनादायी उपचारपद्धतीतून जावं लागतं. याशिवाय, अन्य राज्यातून रूग्ण उपचारासाठी मुंबईत येत असल्याने उपचार होईपर्यंत ते इथेच राहतात. त्यामुळे कोणताही सण त्यांना कुटुंबीयांसह साजरा करता येत नाही. हे लक्षात घेऊन बाल कर्करूग्णांना गणेशोत्सवाच्या सणात सहभागी होता यावं, यासाठी वाडीया रूग्णालयात 1 फुटी चॉकलेट गणेशमुर्तीची स्थापना केली व मुलांकडून ही छोटे बाप्पा चॉकलेट द्वारे बनवून गणपतीचं आयोजन करण्यात आले होते.
या गणेशोत्सवामुळे स्वतःच्या वेदना विसरून काही क्षणांसाठी मुलांच्या चेहऱ्यांवर हसू फुलले होते. यासंदर्भात बोलताना वाडिया रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या की, ‘‘यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा रूग्णालयात गणेशाची स्थापना केली आहे. सध्या रूग्णालयात अनेक बाल कर्करूग्णांवर उपचार सुरू आहेत. दूरवरून रूग्ण उपचारासाठी येत असल्याने ते या ठिकाणीच राहतात. या लहान मुलांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. पण आजाराने कोलमडून न जाता त्यांना ध्यैर्याने तोंड देण्यासाठी खास या मुलांसाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाल कर्करुग्णांनी चॉकलेट पासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे.’’
‘‘बाप्पासाठी सुरेख असा देखावा ही साकारण्यात आला आहे. यात मुलांनी पर्यावरणासंबधी अनेक चित्र काढले आहेत. यासाठी गणपतीसाठी मोदकाचा नैवेद्यही ठेवण्यात आला आहे. हा सण साजरा करताना अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. तसेच आम्ही या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, अशा संस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय’’, असेही डॉ. बोधनवाला म्हणाल्या.
तसेच, एका लहान मुलीने सांगितले की, आम्हाला गणपती उत्सव करताना आनंद होतो.आम्हाला चॉकलेट आणि दूध खूप आवडतं. यंदा आम्हला बाप्पाचा रुपातील चॉकलेट व दुधाच्या नैवेद्याचा प्रसाद खायला मिळाला. बाप्पाकडे आम्ही सर्व ठीक व्हावे यासाठी प्रार्थना केली व कोरोनापासून देश लवकर व्हावं यासाठी प्रार्थना केली.