मुंबई :मुंबईमध्ये कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार (Ganeshostav Guidelines) उत्सवादरम्यान लागणारे सर्व शुल्क मुंबई महापालिकेने माफ केले आहे. तसेच गणेश मुर्त्यांवर असलेले उंचीचे निर्बंध हटवण्यात आले आहे. तरीही भाविकांनी मूर्तीच्या उंचीची मर्यादा स्वखुशीने पाळावी; असे आवाहन (BMC) मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे, तसे परिपत्रक पालिकेने जारी केले आहे.
परिपत्रकात काय म्हटलंय पालिकेने :
1 ) गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी रु .100 / - शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येत आहे . तसेच जर यापूर्वी गणेशोत्सव 2022 साठीच्या मंडपांच्या परवानगीकरीता मंडळांनी शुल्क भरून परवानगी प्राप्त केली असेल तर अशा मंडळांना रु .100 / - चा परतावा लवकरच करण्यात येईल .
2 ) गणेशोत्सव 2022 करिता मूर्तिकारांच्या मंडपांकरिताचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात येईल . तसेच ज्यांनी याअगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल .
3 ) गणेशोत्सव 2022 करिता अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल . तसेच ज्यांनी या अगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल .
4) महापलिकेच्या मंडप उभारणी बाबत उद्यान खाते व मालमत्ता खाते व खाजगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येईल .
5 ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध 2022 च्या गणेशोत्सवाकरिता असणार नाहीत .
6 ) घरगुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती . तरी आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही . परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखूशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
7 ) नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच कृत्रिम विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल .