मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि कायमस्वरुपी सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सर्व विरोधी पक्षांची मोट बांधणार
या बैठकीनंतर पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचबरोबर, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत बैठकीत चर्चा होणार. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा -इंधन दरवाढीमुळे देशभरातील मालवाहतूकदार आक्रमक; मालगाडयांवर काळे झेंडे लावून करणार निषेध
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून भेटीत त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती काय आहे? याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसे एकत्र आणता येईल, या बाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत.