मुंबई -मुंबईमध्ये २९ जूनपासून सतत पाऊस बरसत आहे. गेले चार दिवस मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. या चार दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस ( Mumbai Rains Update ) बरसला. आज ( शुक्रवारी ) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र मुंबईमध्ये पाऊस पडण्या ऐवजी ऊन तापल्याने पावसाने 'फ्राय डे'ला 'ड्राय डे' साजरा केला आहे. यामुळे गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत मुसळधार :मुंबईमध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जून पासून पावसाला सुरुवात झाली. २ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडला. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यावर ४ जुलैपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले चार दिवस मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला होता. या कालावधीत मुसळधार पाऊस पडला. रोज १०० ते १५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होत होती. रात्री आणि विशेष करून मध्यरात्री पावसाचा जोर वाढत असल्याने रात्रीचे सखल भागात काही काळ पाणी साचत होते. पहाट होताच पावसाचा जोर कमी होत होता. यामुळे साचलेल्या पाण्याचा काही वेळातच निचरा होत होता. तरीही रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होत होता. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी २४७२ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ३८ टक्के पाऊस गेल्या आठ ते दहा दिवसात पडला आहे.
मुंबईमध्ये पावसाचा 'ड्राय डे' :हवामान विभागाने राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. आज ( शुक्रवारी ) मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुपारी १ नंतर मुंबईमध्ये अती मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र आज पावसाने आज शुक्रवारी विश्रांती घेतल्याने मुंबईत सूर्य प्रकाश पडला होता.