मुंबई -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने खासदार राहुल शेवाळे आणि युवासेनेच्या वतीने युवासेनेच्या सुमारे एक हजार पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. दादरच्या सूर्यवंशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लसीकरण मोहिमेत खासदार राहुल शेवाळे यांच्यासह आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरताई पेडणेकर, माजी महापौर-नगरसेविका श्रद्धा जाधव अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा -ठाण्याच्या खाडीमार्गे दारूची तस्करी रोखण्यासाठी, राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळाल्या 8 बोटी
आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी खासदार शेवाळे यांच्या वतीने सुमारे एक हजार कोविशिल्ड लसी उपलब्ध करून देण्यात आल्या. अशाच रीतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरातही विशेष लसीकरण मोहीम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरापासून सामन्य जनतेला वैद्यकीय आणि इतर मदत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कोविड योद्धा म्हणून चोख कामगिरी बजावली. यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेनेच्या कोविड योद्ध्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
हेही वाचा -काका पाठोपाठ पुतण्याचाही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन