मुंबई- शिक्षणाचा दर्जा घसरल्याने तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल असल्याने गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या 113 शाळा बंद पडल्या आहेत. याच कालावधीत तब्बल 47 हजार विद्यार्थ्यांनी पालिका शाळा सोडल्याचे समोर आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी सुविधा, दर्जेदार व डिजिटल शिक्षणामुळे पुन्हा पालक आणि विद्यार्थी पालिका शाळांकडे वळत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या शाळांना पुन्हा 'अच्छे दिन' येऊ लागले आहेत.
मराठी भाषिक शाळा बंद पडल्या -मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पुरवणे त्यासह शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे 1 हजार 150 शाळा असून स्वतःच्या मालकीच्या 467 शालेय इमारती आहेत. यात 3 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांची अवस्था आणि देण्यात येणारे शिक्षण यामुळे गेल्या काही वर्षापर्यंत शिक्षणाचा दर्जा घसरला होता. त्यातच मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने पालिकेच्या मराठी व इतर भाषेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली. 2012-13 मध्ये 385 मराठी शाळा होत्या. त्यात 81 हजार 216 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 2021-22 मध्ये 272 मराठी शाळा राहिल्या असून त्यात 34 हजार 14 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दहा वर्षात 113 मराठी शाळा बंद पडल्या असून 47 हजार 202 विद्यार्थी कमी झाले आहेत.
दर्जेदार, डिजिटल शिक्षण -मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडू लागल्या. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. शाळांमधील शिक्षकांना चांगले इंग्रजी शिकवता यावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, यासाठी सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ ( Mumbai Public School ) या नावाने ओळखल्या जात आहेत. सर्व पालिका शाळांना एकाच प्रकारचा रंग दिला जात आहे. शाळांवरील नावाचे फलक आकर्षित बनवले जात आहेत. वर्गात चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल केल्या जात आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
आंतराराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू -महापालिकेने गेल्या काही वर्षात ज्या मराठी शाळा बंद झाल्या त्याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. तसेच सी.बी.एस.ई. बोर्डच्या 11 ( CBSE Board ) , आय.सी.एस.ई. बोर्डची 1 ( ICSC Board ) शाळा सुरू केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आय. बी. ( I. B. - International Baccalaureate ) बोर्डची शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच, माटुंगा येथील एल.के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. ( IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.