महाराष्ट्र

maharashtra

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, पालिकेच्या शिक्षण विभागातील महिला अधिकारी निलंबित

By

Published : Jul 2, 2021, 9:30 PM IST

कोरोनाच्या प्रसारादरम्यान लॉकडाऊन लावण्यात आला. या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याचाच फायदा उचलत पालिकेच्या शिक्षण विभागातील एका महिला अधिकारीने टोळी बनवून लोकांना नोकरी लावतो असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही महिला अधिकारी ऑक्टोबर २०२० पासून फरार होती. तिला पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

मुंबई -कोरोनाच्या प्रसारादरम्यान लॉकडाऊन लावण्यात आला. या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याचाच फायदा उचलत पालिकेच्या शिक्षण विभागातील एका महिला अधिकारीने टोळी बनवून लोकांना नोकरी लावतो असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही महिला अधिकारी ऑक्टोबर २०२० पासून फरार होती. तिला पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक करताच आज पालिकेच्या शिक्षण विभागाने तिला निलंबित केल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
मुंबई महापालिकेत नोकरी लावतो असे संगत एका टोळीने ४५ तरुणांची २ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केली. कोरोनाचे कारण सांगत त्यांनी अनेकांच्या ऑनलाईन मुलाखतीही घेतल्या होत्या. आरोपी गरजू लोकांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये आणि त्यांची मूळ कागदपत्रेही घेत होते. मात्र कोणालाही अपॉईंटमेंट लेटर दिलेच नाही. त्यानंतर हे लोक पळून गेले असता याबाबत नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रॉपर्टी सेलमार्फत तपास सुरु केला असता असे आढळले की मुख्य आरोपी ही महिला असून तिचे नाव प्रांजल भोसले आहे. प्रांजल भोसले पालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासनीक अधिकारी या पदावर कार्यरत होती. आरोपी महिला आणि तिचा पती हे दोघेही गोव्यातील एका गावात लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि दोघांना अटक करुन मुंबईला घेऊन आले. त्यांची चौकशी केली असता आणखी दोघांची नावे समोर आली जे महिलेचे दीर होते. त्या दोघांना ठाणे आणि कल्याण परिसरातून अटक करण्यात आली. या टोळीने आणखी काही लोकांची फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

चार आरोपींना अटक
मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या काही ओळखीच्या लोकांची फसवणूक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलला मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यात एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. प्रांजल भोसले ही पालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासनिक अधिकारी आहे. लक्ष्मण भोसले (महिलेचा पती), राजेश भोसले (प्रांजलचा दीर), महेंद्र भोसले (प्रांजलचा दीर) अशी त्यांची नाव आहेत.

पालिकेच्या सेवेतून निलंबन
२०१९ पासून पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासनिक अधिकारी असलेली प्रांजल भोसले कामावर येत नव्हती. कामावर येत नसल्याने तिला नोटीस पाठवण्यात अली होती. त्या नोटिसीला कोणतेही उत्तर दिलेले नव्हते. पोलिसांनी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आणि ४८ तासाहून अधिक काळ पोलीस तो कोठडीत असल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यानुसार प्रांजल भोसले हिला पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

हेही वाचा -वैफल्यग्रस्त झाल्यानेच चंद्रकांत पाटलांकडून सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details