मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाच्या निवासस्थानाजवळ वाहनात स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सुनील मानेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना एनआयएच्या कोठडीत 1 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
एप्रिलमध्ये मानेला अटक करण्यात आली होती, तर 11 जून रोजी शेलार आणि जाधव यांना अटक करण्यात आली होती. माने पूर्वी न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्याची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) नुकत्याच अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी पुन्हा ताबा मागितला होता, तो मंजूर झाला आहे. सुनील मानेचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. शेलार व जाधव यांना न्यायाधीश पीआर सितारे यांच्यासमोर हजर केले होते.
एनआयएचे आरोप -
शेलार आणि जाधव यांच्या रिमांडची मुदतवाढ देण्याची विनंती करत एनआयएने म्हटले होते की, हिरेनच्या हत्येप्रकरणी वापरलेली गाडी सापडल्यानंतर हे दोघे बेपत्ता होते. दोघेही दिल्लीत तसेच काही अन्य ठिकाणी गेले होते, त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील लातूर येथून अटक करण्यात आली होती.