मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी (१७ जून) मुंबई पोलिसांतील माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. त्यानंतर आज (गुरुवार) प्रदीप शर्मा यांना एनआयएच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एनआयएकडून आज सकाळी 6 च्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील जे. बी. नगर निवास स्थानी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी जवळपास 4 ते 5 तास चालली. यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
प्रदीप शर्मांच्या घरातून पिस्तूल जप्त -
'मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये या तिघांचा सहभाग होता. हे तिघेही सचिन वाजेंसोबत मिळून हा गुन्हा केला आहे. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा या दोघांनी कट रचून मनसुखच्या हत्येनंतर पुरावे नष्ट केले आहेत.' असा युक्तीवाद एनआयएच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच आत्तापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी हे या प्रकरणानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. या पिस्तूलच्या लायसनची मुदत संपली असल्याचेही एनआयएतर्फे सांगण्यात आले.
आरोपीच्या वकीलांकडून आरोपाचे खंडन -
दरम्यान, आरोपींच्या वकीलांकडून एनआयएने लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचेदेखील आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आले. एनआयएने यापूर्वी आरोपींना चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळीही आरोपी उपस्थित होते, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. यावेळी प्रदीप शर्मा भावूक झाल्याचे दिसून आले. तसेच 'माझा आणि सचिन वाजेचा काहीही संबंध नसून अटकेत असलेला संतोष माझा जुना खबरी आहे, बाकी अटक केलेल्या आरोपींना मी ओळखत नाही, असे प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात सांगितले.