मुंबई -भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. तेव्हा सेक्रेटरी, स्टेट ऑफ अमेरिका यांनी भारतात मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे ( Human Rights Violations In India ) प्रकार वाढले असल्याचे वक्तव्य केले. याबाबत या दोन मंत्र्यांनीही पंतप्रधानांना माहिती दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेनन ( Former Mp Majid Menon ) यांनी दिली आहे. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
माजिद मेनन म्हणाले की, जेव्हा अमेरिकेसारख्या देशात मानवाधिकारांच्या उल्लंघनावर दुःख व्यक्त करण्यात आले. या पत्रकार परिषदेला परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री देखील उपस्थित होते. त्यांनी या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या पत्रकार परिषदेला जे दोन मंत्री उपस्थित होते त्यांनी पंतप्रधानांना याची माहिती दिली पाहीजे. हे वक्तव्य खरे किंवा खोटे आहे, हे तपासून त्यावर उत्तर दिले पाहिजे. तसेच, जागतिक स्तरावर देशाबाबत इतके मोठे वक्तव्य झाले असताना कोणत्याही माध्यमांमध्ये याची दखल घेतली गेली नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.