महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी मंत्री शिवतारे ICU मध्ये.. संपत्तीवरून मुलाकडून मानसिक छळ, मुलीच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ - मंत्री विजय शिवतारे यांच्या कुटूंबात गृहकलह

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आणि मुलामध्ये संपत्तीवरून वाद सुरु आहे. विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे - लांडे यांनी फेसबूकवर पोस्ट करुन आपली आई आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात आणि पत्नी- मुलामध्ये संपत्तीच्या वादातून वितुष्ट निर्माण झाल्याची बातमी समोर येत आहे.

vijay shivtare
vijay shivtare

By

Published : Jun 22, 2021, 10:41 PM IST

मुंबई - शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबात संपत्तीच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद पत्नी आणि मुलामध्ये निर्माण झाला आहे. याच प्रश्नी शिवतारे यांच्या कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत आई आणि भावावर गंभीर आरोप केले आहेत. शिवतारे यांच्या कन्या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. ममता शिवतारे लांडे यांनी वडिलांच्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट लिहित हे आरोप करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, माझ्या पित्याची माझ्या भावाने संपत्तीच्या लोभापाई केलेली अवस्था पाहून मी फार अस्वस्थ होत आहे.

ममता शिवतारे- लांडे यांची पोस्ट -


आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिलं. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अशा माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे. मागील काही दिवसात फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्षे असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं. मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे.

डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलिसीसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अशाच बदनामीच्या धमक्या देत आहे. आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका आणि बाबाही अविरत पुरंदरसाठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयुमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले .माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे!!!

ममता यांनी उपस्थित केलेले सवाल -

१) १९९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
२) बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला?
३) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
४) विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावलं?
५) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली. पण मृत्युशय्येवर असलेल्या वडिलांसोबत असा व्यवहार कितीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का?

ABOUT THE AUTHOR

...view details