मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्नाटकातील नेत्याची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी लोकसभेचे विरोधी माजी विरोधी पक्षनेते व कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे राज्याचे प्रभारी होते. आता त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसने महाराष्ट्राला कर्नाटकमधील काँग्रेस नेता दिला असून यासाठी माजी मंत्री एच. के. पाटील यांची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची नियुक्ती केली आहे. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट जारी केले. त्यात त्यांनी 'आदरणीय खा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी दिलेले नेतृत्व आणि केलेले मार्गदर्शन यासाठी त्यांचे आभार. महाराष्ट्रातील काँग्रेसजन कायम त्यांचे ऋणी राहतील. ज्येष्ठ नेते व कर्नाटकचे माजी मंत्री एच. के. पाटील यांची महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!' असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
'काँग्रेस हाय कमांडने मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे. कार्यकारीणी समितीतही काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्र देशातील मोठ्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे भविष्यात अनेक आव्हाने असतील. त्यामुळे पक्षाला संघटीत करण्याचे मी नियोजन केले आहे. मी विद्यार्थीदशेत असताना काँग्रेस पक्षात आलो होतो. पक्षात मला अनेक पदे मिळाली. माझ्याआधी मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्रात काम केले आहे, आता मला त्यांच्याकडून पक्ष बांधणीसाठी मार्गदर्शन मिळेल, असे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षावरही निशाणा साधला. कोरोनाग्रस्तांना उपचार देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. रुग्णालयांमध्ये पर्याप्त सुविधा नाहीत, सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी देत आहे, असा आरोप त्यांनी केला.