मुंबई -महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर विशेष पीएमएलए न्यायालय 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निर्णय देणार आहे. न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही वाचा -Water Taxi In Mumbai : बेलापूर-एलिफंटा मार्गांवर वॉटर टॅक्सी सुसाट; एक हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी केला प्रवास !
जामिनासाठी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन सेशन कोर्टाने फेटाळला होता. 12 तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. 29 डिसेंबर रोजी ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप
20 मार्च 2021 ला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये
अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात 27 जानेवारी रोजी अर्ज करण्यात आला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
ऋषिकेश, सलील देशमुख यांना न्यायालयाचा समन्स
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि दुसरा मुलगा सलील देशमुख यांना न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे. या दोघांना अनेक समन्स बजावूनसुद्धा ते कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचे ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स दिला.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र
100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सह आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
हेही वाचा -महाविकास आघाडीविरोधात आयकर विभाग सक्रिय, राज्याचे राजकीय वातावरण तापले