मुंबई/पुणे -यंदाही पुण्यात २०१७ प्रमाणे पुन्हा एल्गार परिषद भरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 31 डिसेंबरला या एल्गार परिषद आयोजन करण्याच्या हेतूने परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पोलिसांकडे अर्ज केला आहे. हा अर्ज पुणे पोलिसांनी फेटाळला आहे.
उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषद भरवण्यासाठी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. त्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी परवानगी द्यावी की नाही, हे राज्य सरकार ठरवेल, असे सोलापुरात स्पष्ट केले होते. मात्र, एल्गार परिषदेच्या परवानगीचा पुणे पोलिसांनी अर्ज फेटाळला आहे.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन-
एल्गार परिषद भरवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील यांच्या पुढाकाराने निवृत्त शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या परिषदेच्या नियोजनासंदर्भांत नुकतीच साने गुरुजी स्मारकाच्या आवारात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ही परिषद गणेश कला क्रीडा रंगमंच येथे घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यानुसार नोंदणी करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडे त्याबाबतची परवानगी मागण्यात आली आहे.
हेही वाचा-एल्गार परिषदेचा निर्णय राज्य सरकार घेईल - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा-
जातीयवाद, दडपशाही आणि हुकूमशाही विरोधात लढणारे वक्ते या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान गेल्या वेळेचा अनुभव पाहता पोलीस या परिषदेला परवानगी देणार का? याबाबत साशंकता आहे. मात्र जर परवानगी नाकारण्यात आल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.