महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.. - एकनाथ गायकवाड निधन

Former congress MP Eknath Gaiakwad Passes Away
काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..

By

Published : Apr 28, 2021, 11:03 AM IST

Updated : Apr 28, 2021, 4:10 PM IST

12:43 April 28

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला; गायकवाड यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेला, अशा दुःखद भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

चव्हाण म्हणाले की, आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले. पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.

एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो व आमच्या सहकारी प्रा. वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी प्रार्थना अशोक चव्हाण यांनी केली.

12:35 April 28

काँग्रेसची आणि माझी अपरिमित हानी - सचिन सावंत

काँग्रेसची आणि माझी अपरिमित हानी - सचिन सावंत

"काँग्रेसचे माजी अध्यक्ष पितृतुल्य, मार्गदर्शक व अत्यंत जवळीकीचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस विचारांचे पाईक माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन अत्यंत दुःखदायक आहे. काँग्रेस पक्षाची व माझी अपरिमित हानी झाली आहे. शब्द कमी पडत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली!" असे ट्विट करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

12:34 April 28

नाना पटोलेंनी वाहिली श्रद्धांजली..

नाना पटोलेंनी वाहिली श्रद्धांजली..

"राज्याचे शालेय मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष माजी खासदार मा. एकनाथजी गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त कळले. सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गायकवाडांना श्रद्धांजली वाहिली.

12:33 April 28

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली..

"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली!" असे ट्विट करत शरद पवारांनी गायकवाडांना श्रद्धांजली वाहिली आहे.

11:01 April 28

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन..

मुंबई :ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

त्यांचा जन्म 1 जानेवारी 1940 साली सातारा जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या पश्चात दोन मुली व दोन मुले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.

'जायंट किलर'..

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, २०१४च्या मोदी लाटेनंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

राजकीय कारकीर्द..

एकनाथ गायकवाड हे मुंबईतील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जायचे धारावी मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते 1985 ते 1990, 1990ते 1995 आणि 1999 ते 2004 या वर्षात त्यांनी आमदार म्हणून धारावीच्या प्रतिनिधित्व केले.

1999 ते 2004 या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून जबादारी सांभाळली होती. तसेच 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मतदार संघातून निवडून आले होते. 2020 मध्ये त्यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचे सख्य होते. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत असायचे.

Last Updated : Apr 28, 2021, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details