मुंबई - बांद्रा (पूर्व) एमटीएनएलच्या इमारतीला आग लागण्याच्या घटनेतून पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८ मध्ये या इमारतीचे फायर ऑडिट झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, असे असेल तर मग आग विझवताना आणि लोकांची सुटका करताना अग्निशामक दलाला अनेक अडचणी का आल्या, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
एमटीएनएल इमारतीला लाग लागणे हे मुंबई महानगरपालिकेचे अपयश - अशोक चव्हाण
मुंबई महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारुन आपल्या अपयशाची कबुली दिली पाहिजे. या घटनेतून पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, एमटीएनएल इमारतीच्या लहान खिडक्या आणि बंदिस्त रचनेमुळे अग्निशामक दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, असे वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांवरुन दिसून येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याची दखल घेतली पाहिजे. मुंबईत इमारती, पूल कोसळण्याचे आणि आगी लागून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे दुष्टचक्र कधी थांबणार? हा प्रश्न या आगीच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इमारतींचे फायर ऑडिट असो किंवा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट असो, त्यात मोठी हयगय आणि भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक घटनांमधून वारंवार दिसून आले आहे. मुंबई महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारुन आपल्या अपयशाची कबुली दिली पाहिजे, अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे.